Ration दुकानात आता लवकरच Banking सुविधा मिळणार

मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जनसामान्य नागरिकांना सोयीस्कर होईल अशा नवनवीन सुविधा अंमलात आणण्यात येतात. नुकतीच या विभागाकडून Ration दुकानात बँकिंग सुविधा देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजेच खेड्यापाड्यातील जनसामान्य नागरिकांना बँकेच्या सुविधा मिळवण्यासाठी कोणत्याही तालुक्याला जाण्याची आवश्यकता नाही; त्याऐवजी त्यांना त्यांच्या गावात रेशन दुकानांमध्ये रास्तभाव दुकानदाराकडून बँकेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

रेशन दुकानात बँकिंग सुविधा

राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात बँकेच्या सुविधा उपलब्ध नसल्याकारणाने नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जिथे बँक असेल तिथे जावे लागते. ही बाब लक्षात घेता ग्रामीण भागातील नागरिकांना गावात बँकेच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात व रास्तभाव दुकानदारांना उत्पन्न मिळावे, या अनुषंगाने राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून गावातच बँकिंग सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या सुविधांमध्ये कॅशलेस व्यवहार, देयक, भरणा, RTGS, कर्ज वाटप इत्यादींचा समावेश असेल.

खरीप पीक कर्ज वाटप; कोणत्या पिकाला किती कर्ज मिळणार ?

गावातील नागरिकांना बँकिंग व्यवहार करण्यासाठी रेशन धान्य दुकानातील रास्त भाव दुकानदाराकडून ओटीपी व बायोमेट्रिक प्रणाली द्वारे बँकेच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी ग्राहकांच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.

IPPB प्रमाणे बँकिंग सुविधा

केंद्राच्या दळणवळण मंत्रालयामार्फत राज्यात 2018 पासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याच धर्तीवर आता नागरिकांना रास्तभाव दुकानाच्या माध्यमातून बँकेच्या विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या सेवा रेशन दुकानात लवकरच देण्यात येतील.

बँकेचा आणि रास्तभाव दुकानदारांचा फायदा

यासंदर्भात बँकेकडून जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नेमण्यात येतील. संबंधित बँकांना रेशन दुकानदाराशी करार करावा लागेल. या पद्धतीमुळे बँकांचा अधिकचा व्यवसाय होईल त्याचप्रमाणे रास्तभाव दुकानदारांना उत्पन्नाचा आणखी एक वेगळा मार्ग उपलब्ध होईल. रेशन दुकानदारांना नियमित मासिक कमाईवर काम करण्याची संधी देण्यात येईल. हे काम ऐच्छिक असून ज्या दुकानदारांनी करार केलेला असेल, त्यांनाच बँकिंग सुविधा देण्यात येतील.

Leave a Comment