राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता शेतकऱ्यांना येत्या गुरुवारी म्हणजेच 26 ऑक्टोबर 2023 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शिर्डी याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात पहिल्या हप्त्याचे वितरण होणार असून या कार्यक्रमाला राज्यातील मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
नमो शेतकरी योजना पहिला हप्ता
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच राज्यशासनाची सुध्दा एखादी योजना असावी, असा मानस शासनाचा होता. त्यामुळे राज्यशासनाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना जाहीर करण्यात आली. नुकताच या योजनेअंतर्गत 1720 कोटीचा हप्ता वितरित करण्यासाठीचा पहिला शासन निर्णय सुध्दा शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे.
महाआयटी लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाकडून पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी वेळ लागत होता; परंतु आता या सर्व अडचणी दूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023 रोजी वितरित केला जाणार आहे. राज्यातील किती शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 1ला हप्ता मिळेल? याचा आकडा अद्याप संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेला नाही.
कृषी विभाग लाभार्थी पडताळणी (26 ऑक्टोबर)
- पीएम किसान 14व्या हफ्त्याची लाभार्थी संख्या – 85.60 लाख
- राज्यातील एकूण पात्र लाभार्थी – 93.07 लाख
- भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेले शेतकरी – 91.92 लाख
- अद्ययावत प्रलंबित लाभार्थी – 1.15 लाख
- बँक खाते आधार संलग्न प्रलंबित लाभार्थी – 5.98 लाख
- ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित लाभार्थी – 5.26 लाख
नमो शेतकरी योजना पहिला हफ्ता कोणा-कोणाला मिळणार ?
- सदर योजनेचा लाभ दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
- एका कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
- कुटुंबातील पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकाच व्यक्तीला नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाईल.
- आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा पंचायत समिती सदस्य यासारख्या उच्चपदस्थ व्यक्तींना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
- सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- 2019 पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. 2019 नंतर नावावर शेतजमीन झाल्यास अशा शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही.
पीएम किसान योजना केंद्रशासनाकडून राबविली जाणारी महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे संपूर्ण देशभरातील शेतकरी या योजनेचा लाभ मिळू शकतात; परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजना फक्त महाराष्ट्रपुरती मर्यादित असल्यामुळे, या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकरीच घेऊ शकतील.