Crop Insurance : ई-केवायसी केलेला राज्यातील जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया काल दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. मंत्री श्री.अनिल पाटील यांनी संगणकीय प्रणालीवर कळ दाबून शेतकऱ्यांसाठीच्या निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली.
DBT प्रणालीमार्फत निधी वाटप
गेल्या वर्षीच्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं. नुकसान भरपाईपोटी शासनाकडून शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून 1500 कोटी रु. इतका निधी मंजूर करण्यात आला होता. अपात्र व बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी त्याचप्रमाणे पारदर्शकता आणण्यासाठी, मदत व पुनर्वसन विभागाने निश्चित करण्यात आलेल्या डीबीटी (DBT) प्रणालीमार्फत या निधीच वितरण संबंधित शेतकऱ्यांना केलं जाणार होतं, त्याची वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे.
काल मंत्रालयामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील यांनी सदर निधी वाटपाबाबत आढावा घेतला. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल, अश्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी वाटप करण्याची किंवा थेट जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या तारखेपर्यंत रक्कम जमा होणार
वितरित करण्यात आलेला हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. त्याचप्रमाणे पुढील शुक्रवारपर्यंत उर्वरित 2,50,000 लाभार्थी शेतकऱ्यांकरिता 178,25 कोटी इतका निधी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली. उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी जवळील आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनसुध्दा मंत्री श्री.पाटील यांच्यामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आली.
सदर ई-केवायसी करण्याची सेवा निशुल्क असल्याची माहिती देण्यात आली, तसेच डीबीटी प्रणालीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या त्रुटीदेखील तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शासन शेतकऱ्यांपूर्ती सजग असून शेतकऱ्याच्या कोणत्याही अडचणीला किंवा निधीसाठी कमतरता भासू देणार नसल्याची शाश्वती मंत्री श्री.पाटील यांनी दिली.
🤔 नमो शेतकरी योजनेचा हफ्ता कधी मिळणार ! इतका विलंब का ?
त्याचप्रमाणे उर्वरित शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या सूचना देखील राज्यातील सर्व तहसील व संबंधित यंत्रणांना मंत्री श्री. पाटील यांच्यामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी सततच्या मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठी ई-केवायसी प्रक्रिया केलेली नसेल, त्यांनी जवळील महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन Kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, त्यानंतरच लाभ देण्यात येईल.