फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान सरकारकडून मिळतय ! या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अर्जासाठी अवाहन

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MNREGA) नाशिक विभागात 2025-26 या आर्थिक वर्षात एकूण 8 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीत रोजगार आणि उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे, यासाठी शासनाकडून 100 टक्के अनुदान दिले जाते. या सुविधेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्री. सुभाष काटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MNREGA) राबविण्यात येणाऱ्या फळबाग लागवड कार्यक्रमाचा लाभ काही विशिष्ट पात्र लाभार्थ्यांना मिळू शकतो. या योजनेत सहभागी होण्यासाठी खालील प्रवर्गातील व्यक्ती पात्र आहेत.

  • जॉबकार्डधारक शेतकरी
  • अनुसूचित जाती व जमातीचे शेतकरी
  • भटक्या व विमुक्त जमातीतील लाभार्थी
  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
  • स्त्री कुटुंब प्रमुख असलेले शेतकरी
  • दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख
  • भू-सुधार योजनेचे लाभार्थी
  • प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी

या योजनेचा उद्देश वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना फलोत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे हा आहे.

कृषी कर्ज माफी योजना 2008 अंतर्गत अल्पभूधारक व सीमांत शेतकरी तसेच अनुसूचित जमातीचे व अन्य पारंपरिक वन निवासी अधिनियम 2006 नुसार पात्र लाभार्थी – या पैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याची संधी आहे.

या लाभासाठी 2 हेक्टरपर्यंत क्षेत्राची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.योजनेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक श्री. सुभाष काटकर यांनी केले आहे.