महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर वंचित व गोरगरिबातील कुटुंब वास्तव्य करतात. अशा वंचित गटातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मातृत्व वंदना योजना अशा विविध योजनांचा समावेश आहे. या नागरिकांना उपचार व तपासणीसुद्धा मोफत मिळाव्यात यासाठी शासनाकडून आणखी एक पाऊल उचलण्यात आलेलं आहे.
मोफत उपचार व तपासण्या
सार्वजनिक आरोग्य विभागाशी सलग्नित राज्यातील जवळपास 2 हजार 418 दवाखाने, आरोग्य संस्था यामध्ये आता सर्व प्रकारचे उपचार आणि तपासण्या मोफत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून या निर्णयाला येत्या 15 ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात येईल अशी माहिती दिली जात आहे.
यापूर्वी रुग्णांना दवाखान्यात केसपेपर काढण्यासाठी त्यानंतर योग्य तो उपचार मिळवण्यासाठी बराच वेळ लागत होता; परिणामी रुग्णांना दवाखान्यात प्रतीक्षा करावी लागत होती, परंतु हा वेळात वाचणार असून उपचारासाठी आलेल्या नागरिकांना, रुग्णांना लवकरात लवकर उपचार संबंधित विभागाकडून मिळणार आहे.
या ठिकाणी सवलत लागू असणार
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील प्राथमिक आरोग्य केंद्र, खेड्यापाड्यातील ग्रामीण रुग्णालय, विशेष स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय, अतिविशेष उपचार रुग्णालय, कर्करोग रुग्णालय अशा राज्यातील विविध रुग्णालयामध्ये ही सवलत लागू असणार आहे.
या तपासण्यात मोफत – डॉ.तानाजी सावंत
जनसामान्य जनतेला दवाखान्यातील काही चाचण्या परवडण्याजोग्या नसतात; परिणामी रुग्ण विविध रोगांना बळी पडतो हाच विचार करून जनतेला सर्वसामान्य तपासण्या, चाचण्या, उपचार मोफत मिळावेत; म्हणून शासनाकडून आरोग्य विभागाशी संबंधित हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेला आहे. जनतेला सर्व तपासण्या, रक्तचाचण्या, सर्व डायग्नोस्टिक सेवा अगदी मोफत मिळतील अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्यामार्फत देण्यात आली.