महाराष्ट्र शासन राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी विविध शैक्षणिक व सरकारी योजना वेळोवेळी राबवित असतं. त्या योजनांपैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना होय. या योजनेच्या माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्यांचा आकस्मात अपघात झाल्यास आर्थिक मदत दिली जाते. सदर योजनेसंदर्भातील थोडक्यात माहिती जशाप्रकारे अर्ज प्रक्रिया, पात्रता, अनुदान याठिकाणी पाहूयात.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राज्यशासनाकडून 26 ऑक्टोबर 2022 पासून सुरू करण्यात आली. ही योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे खेड्यापाड्यातील व शहरातील विद्यार्थी मोठ्याप्रमाणावर शिक्षणासाठी संबंधित संस्था किंवा शाळेमध्ये जातात; परंतु यादरम्यान एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्यांना आर्थिक मदत मिळावी हा होय.
राज्यातील इयत्ता १ली ते इयत्ता १२वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या नुकसानीची काही प्रमाणात नुकसान भरपाई किंवा सुरक्षा कवच देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. उदा. रायगड जिल्ह्यात 21 विद्यार्थ्यांचा नैसर्गिक आपत्ती घडवून पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला, या मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी 75 हजार रु. असं 15 लाख 30 हजाराचा अनुदान देण्यात आला.
कशासाठी किती मदत ?
- विद्यार्थी जखमी झाल्यास – 1 लाख रु.
- अपघाती मृत्यू झाल्यास – 1.50 लाख रु.
- कायमचे अपंगत्व आल्यास – 75 हजार ते 1 लाख रु.
- शस्त्रक्रिया करावी लागल्यास – प्रत्यक्ष हॉस्पिटल कडून आलेला खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची आर्थिक मदत.
अर्ज कोठे करावा ?
तुमच्या कुटुंबातील किंवा नातेवाईकातील एखादा शालेय शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आकस्मात अपघाताला बळी पडल्यास किंवा शस्त्रक्रिया करावी लागल्यास, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना शिक्षण विभागाकडे अर्ज करावा लागतो.
मदत कोणाला मिळणार ?
राज्यातील बहुतांश पालकांची परिस्थिती बिकट असतानासुद्धा अहोरात्र काबाडकष्ट करून पालक आपल्या मुलांना शिक्षण देत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या पश्चात त्यांच्या पालकांना ही आर्थिक मदत दिली जाते.
कोणत्या परिस्थितीत अनुदान मिळणार ?
शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अकस्मात अपघात, शस्त्रक्रिया करावी लागली किंवा अपघाती व अन्य आजारपणाने मृत्यू झाल्यास राजीव गांधी विद्यार्थी अपघात चालूग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून पालकांना मदत दिली जाते.